ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊनमुळे व्यवसायात आलेल्या अपयशाने एक फॅशन डिझायनर बेरोजगार झाला होता. त्यानंतर त्याने नामी शक्कल लढवत चोरलेल्या दुचाक्यांच्या डिक्कीत ठेवलेल्या आरसी बुकच्या आधारे त्या दुचाकीच्या मालकाचे बनावट कागदपत्रे बनून ओएलएक्सवर विक्री केल्याचे समोर आले आहे. युसूफ शकील अहमद खान (वय ३८) असे या फॅशन डिझायनरचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आणि फिल्मी स्टाईलने दुचाक्या लंपास करून कब्रस्थानमध्ये लपविणाऱ्या सराईत शाहरूखला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा -VIRAL : "दादागिरी कधी थांबणार".. मारहाण झालेल्या तरुणाने युट्यूबवर व्हिडिओ टाकून केला सवाल
शाहरूखकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून दुचाक्या लंपास करण्याच्या घटना सतत घडत असल्याने डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनानुसार, स.पो.नि अनिल भिसे, फौजदार सुनिल तारमळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ज्या भागांतून वाहनांच्या सर्वाधिक चोऱ्या झाल्या त्या भागात जाळे पसरून संशयितांवर पाळत ठेवली. पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यात शाहरूख शेख अडकला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान मुंब्र्यातील सैनिक नगरमध्ये राहणाऱ्या या चोरट्याने त्याच्या साथीदाराच्या साहाय्याने मानपाडा, नारपोली, चितळसर, डायघर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाक्या चोरी केल्याचे समजले. त्यानंतर चोरलेल्या सर्व दुचाक्या त्याने मुंब्र्यातील सिया कब्रस्तानजवळ लपवून ठेवल्याची कबूली दिली. या सर्व दुचाक्यांची विक्री करण्याचा त्याचा प्लॅन होता. पोलिसांच्या पथकाने सिया कब्रस्तानातून ५ लाखांच्या तब्बल १३ दुचाक्या हस्तगत केल्या. शाहरूखकडून दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.