ठाणे - गेल्या काही वर्षात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल माध्यमांचा वापर करून ओळखी वाढवून झालेल्या विविध गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे फसवणुकीचे असून त्यांनतर याच माध्यमांवर ओळखीचा फायदा घेत, अत्याचाराच्या घटनातही वाढ झाली आहे. अशातच एका १३ वर्षीय पीडितेशी इंस्ट्राग्रामवर मैत्री करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात समोर आली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी मित्रावर अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आज सकाळी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रिजवान शेख असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगरमध्ये राहणारा आहे.
धमकी देऊन घेऊन गेला, आणि अत्याचार केला -
पीडित मुलगी कुटूंबासह उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. गेल्या काही दिवसापासून आरोपी व पीडित मुलीची इंस्ट्राग्रामवर ओळख होऊन मैत्री निर्माण झाली होती. याच मैत्रीचा फायदा घेऊन बुधवारी रात्रीच्या सुमारास पीडित मुलीच्या कुटुंबाला ठार मारण्याचा मोबाईलवर मेसेज पाठवून शहाड रेल्वे स्थानकानजीक आरोपीने भेटण्यासाठी बोलावले. त्यांनतर धमकीला घाबरून पीडित मुलगी त्या ठिकाणी केली. त्यानंतर आरोपीने एका रिक्षात बसून मुरबाड रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. घडलेल्या प्रसंगानंतर पीडित मुलगी रडत घरी गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांनी पीडितेला मध्यरात्रीच्या सुमारास नेऊन उल्हासनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनतर तिच्यावर घडलेल्या प्रसंगांचे कथन करताच पोलिसांनी आरोपी रिजवानवर अत्याचारसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत आज सकाळच्या सुमारास आरोपीचा शोध घेऊन त्याला उल्हासनगरमधून अटक केली.