ठाणे :दोन दिवसापूर्वी भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रम शाळेतील ३० विध्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना (30 Students Corona Positive in Chimbipada) कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोना बाधित पाल्यांना घेऊन आरोग्य केंद्रातून पालकांनी पळ काढला होता. त्यानंतर ग्रामीण आरोग्य यंत्रणा खळबळून जागे होऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी कोविड लसीकरणाचा धडाका लावला होता. आज दिवसभरात ५ हजार ६९६ मुला-मुलींचा कोविड लसीचा पहिला डोस दिला. विशेष म्हणजे कोरोनाचा फैलाव पाहता ग्रामीण क्षेत्रातील सर्वच शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा उद्यापासून बंद करण्याचा निर्णय आज सायंकाळच्या सुमाराला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.
१२ हजारहुन अधिक मुलांना लसीकरणाचा पहिला डोस ग्रामीण भागातील पाचही तालुक्यात लसीकरण सत्राचे ३ जानेवारीपासून आयोजन करण्यात आले असून यामध्ये जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच शहापूर तालुक्यातील वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्र, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कल्याण तालुक्यातील खडवली प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी तालुक्यातील आनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जीवनदिप कॉलेज गोवेली आणि सेक्रेड हायस्कूल वरप, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, भिवंडी अशा एकूण बारा ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ३ हजार १६४ मुला मुलींना लसीकरणाचा पहिला डोस दिला. तर ४ जानेवारी रोजी २ हजार ४४६ मुला मुलींना लसीकरणाचा पहिला डोस दिला. तर आजही ग्रामीण भागातील शहापूर तालुक्यातील दोन महाविद्यालयातील ५०० च्या जवळपास मुला मुलींना पहिला डोस देण्यात आल्याची माहिती शहापूर प्राथमिक आरोग्य अधिकारी रुपाली शेडगे यांनी दिली आहे. तर आज दिवसभरात ५ हजार ६९६ ग्रामीण भागात मुला मुलींचे लसीकरणाचा पहिला डोस दिला असून तीन दिवसात जवळपास बारा हजाराहून अधिक मुलांना लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे.
१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ७५ हजार
जिल्हातील ग्रामीण भागात ७५ हजारच्या जवळपास १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या उंबरठयावर कोरोना येऊन ठेपला. दिवसागणिक ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात शेकडो विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या पालकांकडे आजही मोबाईल नाही. त्यामुळे ऑनलाईन लसीकरण नोंदीसाठी त्यांच्या समोर प्रश्न उभा ठाकला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या पालकांकडे मोबाईल आहे. पण नेटवर्कची समस्या ग्रामीण भागात कायम येत असल्याने त्यांनाही ऑनलाईन लसीकरण नोंद करण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातही लसीकरण केंद्र ग्रामीण आरोग्य विभागाने सुरु करावे अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. तर ७५ हजार १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या उपाययोजना जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाने आखल्याचे सांगण्यात आले आहे.