ठाणे - मानधन, पेन्शन, मोबाईल आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने येत्या २० जून ते २५ पर्यंत यवतमाळ ते अमरावती असा १०० किलोमीटरचा लॉंग मार्च काढण्यात ( yavatmal to Amravati Anganwadi Workers march ) येणार आहे. या लॉंग मार्चमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी या लॉंग मार्चमध्ये सामील होणार आहेत. हा लॉंग मार्च २५ तारखेला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एमए पाटील यांनी दिली.
यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयावर धडकणार मोर्चा - राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, त्यांना पेन्शन योजना लागु करावी. अशा अनेक मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली. मोठंमोठे मोर्चे काढण्यात आले. मात्र राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास अपयशी ठरत असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने येत्या २० जून रोजी यवतमाळ ते अमरावती असा पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. २० जूनला अमरावतीवरून या लॉंगमार्च ची सुरुवात होणार आहे. १०० किलोमीटरचे अंतर पार करत २५ जूनला हा लॉंगमार्च महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिली.