ठाणे -कळवा-खारीगाव येथे आयोजित केलेल्या महालसीकरण शिबिराचे श्रेय घेण्याच्या नादात महापौर नरेश म्हस्के यांनी,‘ लसीकरणासाठी लागणारा दहा लाखांच्या खर्चाचा भार आम्ही उचलला होता’, अशी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, गटनेते नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे पालिकेत जाऊन महापौरांना 20 लाख रुपयांचा धनादेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी तो स्वीकारला नाही. पालिकेच्या लसीकरण महोत्सवाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात असून बॅनरवरही गृहनिर्माण मंत्र्यांना स्थान दिले जात नसल्याबाबत आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला.
आनंद परांजपे यांनी दिलेला 20 लाखांचा धनादेश महापौरांनी स्वीकारला नाही
नुकतेच आनंद विहार, खारीगाव येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी लसीकरणासाठी आवाहन करणारे फलक राष्ट्रवादीने लावले होते. हे फलकही काही समाजकंटकांनी फाडले होते. पालिकेने आयोजित केलेल्या शिबिरात शिवसेना नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. त्यावरुन राष्ट्रवादीने जोरदार टीका केली होती. या टीकेस उत्तर देताना, केवळ लस सरकारने पुरविल्या असून इतर खर्च शिवसेनेने केला असल्याच्या आशयाचे विधान महापौर नरेश म्हस्के यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेण्यासाठी आनंद परांजपे यांनी थेट 20 लाखांचा धनादेश देत कोपरी-पाचपाखाडी येथील रोड क्रमांक 22 येथे आणि ठाणे शहरातील पालिका मुख्यालयासमोर लसीकरण शिबिर आयजित करावे; त्याचा खर्च या 20 लाखांतून करावा, असे सुचविले. मात्र, महापौरांनी हा धनादेश स्वीकारला नाही.
शहरातील विकास कामांचा खर्च हा काही शिवसेना आपल्या बँक खात्यातून देते का
या लसी महाराष्ट्र शासन पाठवत असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितल्यानंतर महापौरांनी “तुम्ही शासनाकडून लस आणा; आम्ही तुम्हाला ओळखत नाही”, असे विधान केल्यामुळे महापौर दालनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आनंद परांजपे यांनी, कोविडचा लसीकरण महोत्सव आम्हाला कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहर मतदारसंघात घ्यायचा आहे. याचे निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तसेच, शनिवारी (दि. 16) महापौरांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले होते की, जरी लसीकरण महापालिका करत असली तरी त्याचा खर्च शिवसेनेचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वैयक्तीक खासगी बँक खात्यातील वीस लाखांचा धनादेश आपण महापौरांना द्यायला गेलो होतो. खारीगाव येथे शिवसेनेचे एकच नगरसेवक आहेत. तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. कळवा प्रभाग समितीच्या सभापती वर्षा मोरे यांच्या माध्यमातून रोज लसीकरण चालू आहे. पण, लसीकरणात राजकारण करायचे, असे धोरण सत्ताधार्यांचे आहे. या भेटीत महापौरांनी लसीकरणाचा खर्च राष्ट्रवादीच्या खिशातून येतो का, असा सवाल केला आहे. त्यावर परांजपे यांनी शहरातील विकास कामांचा खर्च हा काही शिवसेना आपल्या बँक खात्यातून देते का, करदात्यांच्या पैशातूनच खर्च होत असतो ना, असवाल उपस्थित केला.
पोस्टर फाडणारा सेनेचा नगरसेवक