ठाणे -मिसेस देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला चपराक लगावत पोलीस कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याचे पडसाद इतरत्र उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वर्ग करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे महापालिकेची बँक खातीही 'अॅक्सिस'मधून वगळण्याचे महापौराचे आदेश - News about Amrita Fadnavis
मिसेस देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला चपराक लगावत ठाणे महापालिकेची अॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत्त बँकेत वळवण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. त्यांनी या बद्दल प्रशासनाला आदेश दिले आहेत.
शिवसेना-भाजप महायुतीमध्ये ठिणगी पडून महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून फडणवीस विरुद्ध सरकार असा सामना गेले काही दिवस रंगलेला दिसून येत आहे. या सामन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत गेल्या काही दिवसापासून ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टिकास्त्र सोडले आहे. हे कसले ठाकरे, केवळ आडनाव ठाकरे असले म्हणून कुणी ठाकरे होत नाहीत. असेही ट्विट अमृता यांनी केले होते. त्यानंतर, फडणवीस विरुद्ध शिवसेना असे ट्विटरयुद्ध रंगले होते. हे युद्ध सुरु असतानाच सरकारने अॅक्सिस बँकेतील खाती स्टेट बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती इतर बँकेत वर्ग करण्यात येणार असून ठाणे महापालिका आणि कर्मचाऱ्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, याचे पडसाद आता पालिकेच्या महासभेतदेखील पाहायला मिळणार आहेत.