ठाणे -मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात बंद असलेल्या शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नियमितपणे सुरू होतील. कोरोना महामारीत हरवलेला वह्या पुस्तकातील पानांचा हवाहवासा वाटणारा गंध आता ठाण्यातील बाजारपेठेत शालेय साहित्यांच्या ( School stationery Thane ) दुकानातून दरवळू लागला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे गणवेशाच्या कोरा करकरीत ( price Rise of school uniforms ) स्पर्शाला मुकलेले चिमुकले यंदा ऑफलाइन शिक्षणामुळे प्रत्यक्ष गणवेश घालून रूबाबात शाळेत प्रवेश करणार आहेत. यंदा गणवेशाच्या किंमतीत पण पाच ते दहा टक्के वाढ झाली असून ज्यूनियर, सिनियर गणवेश ४५० रू तर मोठ्या मुलांचा ड्रेस ५०० रू असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मागील दिड महिन्यांपासून उन्हाळी सुटीमुळे बंद असलेल्या शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात उघडणार आहेत. तर सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात उघडणार असून दोन वर्षांनंतर शालेय साहित्य खरेदी करण्यात पालक विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. ही गोष्ट आम्हा दुकानदारांसाठी सुखावह आहे. यंदा कागदाचे भाव वाढल्याने वही तसेच कॅमलिनच्या वाॅटर कलर संचामध्ये १० टक्के झाली आहे. तर पाठ्यपुस्तकांच्या किंमतीत वाढ झाली नसून २५ वर्षानंतर पाच रूपयांच्या पेनाची किंमत सात रूपये झाली असल्याची माहिती कुणाल विकमने दिली. दुसरीकडे मराठी शाळांचा अभिमान असणारी राजाची दगडी पाटी, पाटीवरील पेन्सिलचा बाॅक्सची शेकड्याने असणारी मागणीचे प्रमाण अगदीच घटले आहे.