ठाणे -पायातील चप्पल न्यायाधीशांवर भिरकावण्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एम. गुप्ता यांनी आरोपीला दोन वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. गणेश लक्ष्मण गायकवाड (३५) असे आरोपीचे नाव आहे. कारागृहात बंदिस्त असताना सुनावणीसाठी न्यायालयात आणल्यानंतर सुनावणी दरम्यान आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली होती.
आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाड(३५) हा वाशी येथील रमाबाई झोपडपट्टीमधील रहिवासी आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो ठाणे कारागृहात बंदिस्त होता. आरोपीला न्यायमूर्ती आर.एस. गुप्ता यांच्या दालनात सुनावणीसाठी 28 जून, 2019 रोजी आणण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला तुझा वकील आला आहे का? अशी विचारणा केली. न्यायाधीशांच्या या प्रश्नांवर तुम्हीच मला वकील दिला असून तो येत नाही, असे आरोपीने उत्तर दिले. तुला दुसरा वकील देतो, पुढच्या तारखेस केस चालवू, असे न्यायाधीशांनी म्हटलं. न्यायाधीशांच्या या व्यक्तव्यानंतर गणेशने स्वतःच्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांवर भिरकावली आणि शिवीगाळ देखील केली.
2 वर्षाचा सश्रम कारावास -
आरोपीने हिंदी भाषेत शिवीगाळ केल्याचा युक्तीवाद सरकारी वकील एस.एम. दांडेकर यांनी केला. तर तपास अधिकारी यांनी कुठलेच साक्षीदाराचे स्टेटमेंट नोंदवलेले नसल्याचे आरोपीच्या वतीने न्यायालयात बलदेव राजपूत यांनी सांगितले. ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एम. गुप्ता यांनी सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपी गायकवाडला नव्या कायद्यानुसार भादंवि 353 कलमाअंतर्गत 2 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे.