ठाणे :शुल्लक वादातून एका ४५ वर्षीय आरोपीने शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर चाकूने हल्ला करीत दोघांची हत्या केली. तर याच कुटुंबातील चौघा माय - लेकांवरही चाकूने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. ही घटना गैबीनगर मधील खान कंपाऊंड परिसरात असलेल्या खान चाळीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येसह गुन्हा दाखल करण्यात येऊन हल्लेखोराला अटक केली आहे.
मोहंमद अन्सारुलहक मोहंमद लुकमान अन्सारी वय (४५ ) असे दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव असून कमरुजमा अन्सारी (वय ४२) आणि इम्तियाज मो. जुबेर खान (वय ३५) असे हत्या झालेल्या दोघांचे नावे आहेत. तर मृत झालेल्या अन्सारींची पत्नी हसीना (वय ३६) आरीबा वय १६) रेहान (वय १५) हफ़िफ़ा (वय ११) हे जखमी झाले आहेत.
यामुळे घडले हत्याकांड
भिवंडीतील गैबीनगर भागातील खान कंपाउंड परिसरात हल्लेखोर व अन्सारी कुटूंब समोरच एका चाळीत राहतात. काही दिवसापूर्वी मृताची पत्नी हसीनाने हल्लेखोराला 'भाइयों का फुकटका खाता है. और लोगो को परेशान करता है' असा टोमणा मारला होता. याचाच राग मनात धरून आज (शुक्रवारी) हल्लेखोराने कमरुजमा अन्सारी यांच्या घराबाहेर उभा असताना त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर चाकूने हल्ला करताना शेजारी राहणारा इम्तियाजने मध्यस्थीस आला. हे पाहून हल्लेखोराने त्याच्यावरही चाकूने वार केले. यावेळेस पत्नी हसीना व इतर तिघे मध्ये आले असता त्यांनाही जखमी केले.