ठाणे- मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकुने जीवघेणा हल्ला झाला होता. यामध्ये आयुक्त पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेली होती. या प्रकरणी हल्ला करणारा परप्रांतिय आरोपी अमरजीत यादव याला शनिवारी कासारवडवली पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजार करण्यात आले होते. त्यावेळी ठाणे न्यायालयाने यादव याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान महापालिकेच्या महासभेत हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी मागणी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण "फास्टट्रॅक"वर चालण्यासाठी महासभेत प्रस्ताव ! आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
आरोपीला यापूर्वी सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपीचा तपास पूर्ण केला असून त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. त्यामुळे ठाणे न्यायालयाने आरोपीला यावेळी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी अमरजीत यादव याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण "फास्टट्रॅक"वर चालण्यासाठी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फास्टट्रॅकसाठी येणार प्रस्ताव
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमरजीत यादव याला अटक केल्यानंतर ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. सदर प्रकरणाचा खटला ठाणे न्यायालयात जलदगतीने( फास्टट्रॅक ) चालवे, यासाठी येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे.
ठाण्यात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पिंपळे यांच्या हातावर हल्ला झाल्याने त्यांची बोटे छाटल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पिंपळे यांना तत्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपळे यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता न करण्याचे आश्वासन दिले होते. तर, विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पिंपळे यांची भेट घेत हल्ल्याचा निषेध करून कारवाईचे मागणी केली होती.