ठाणे - वीज ट्रान्सफॉर्मरमधून चोरट्यांनी ऑईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला आणि वेगळेच संटक उभे राहिले. येथे वीज ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागली. ही घटना अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील क्रेमॉइंट कंपनीत घडली आहे. मात्र, ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याचे पाहून चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
वीज ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल चोरताना लागली भीषण आग अग्निशमन दल वेळातच घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी परिसरात क्रेमॉइंट नावाची कंपनी असून. या कंपनीच्या बाजूला विद्यूत विभागाचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. या आगीमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये एक स्फोटसुद्धा झाला. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागलेल्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता, ही आग ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरताना लागल्याची प्रकार समोर आली आहे.
ऑईल चोरण्यासाठी प्लास्टिकच्या पाईपचा वापर
चोरट्यांनी वीज ट्रान्सफॉर्मरच्या खालच्या बाजूला ऑईल चोरण्यासाठी प्लास्टिकचे पाईप बसवण्यात आले होते. तसेच, ट्रान्सफॉर्मरपासून काही अंतरापर्यंत काही प्लास्टिकचे पाईप टाकून त्याद्वारे ही चोरी केली जात असल्याचे आढळून आले. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी ऑईल चोरी करणारे चोरटे ट्रान्सफॉर्मर जवळच उभे होते. मात्र, आग लागताच हे चोरटे तिथून पळून गेले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.