ठाणे - बापाने मुलीच्या लग्नास नकार दिल्याच्या वादातून तरुणाने तिच्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी - वाड राज्यमार्गावरील कवाड गावाच्या हद्दीत घडली आहे.
हेही वाचा -Case Against Couple : रेल्वे स्थानकात खुल्लमखुल्ला रोमान्स करणाऱ्या 'त्या' प्रेमीयुगलावर गुन्हा दाखल
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पप्पूकुमार रामकिशोर शाह (वय २६) असे आरोपी तरुणाचे नाव असून, तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे. तर, कमलजित सांडे (वय ५२) असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.
डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने काढला काटा
कमलजित कुटंबासह उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरात राहात, तर त्याच शेजारी आरोपी पप्पू गेल्या ५ वर्षांपासून राहत असल्याने दोघांमध्ये ओळख होती. त्यामुळे, आरोपीचे कमलजित यांच्या घरी येणे जेणे होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी आरोपीने कमलजित यांच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी मागणी केली. मात्र यामधून दोघांमध्ये भाडणे होऊन कमलजित यांनी आरोपीला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपीने कमलजित यांची माफी मागत पुन्हा बोलचाल सुरू केली. मात्र आरोपीच्या डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने आरोपी पप्पूने कमलजित यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार ४ मार्च रोजी पार्टीच्या बहाण्याने कल्याणहून भिवंडीला बसमध्ये नेले. त्यानंतर आनगावला जाणाऱ्या एका खासगी वाहनात बसले. मात्र, मध्येच कवाड गावाच्या हद्दीत उतरून एका कंपाऊंड असलेल्या मोकळ्या जागेत बसून दोघांनी दारूची पार्टी केली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या मागणीवरून वाद झाला. त्यावेळी आरोपीने कमलजित यांच्या गळ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून तो पुन्हा उल्हासनगरात आला.