ठाणे - सोबत काम करणाऱ्या सहकारी मित्राची केवळ ३५० रुपयांच्या वादातून कल्याण रेल्वे स्थानकावर धारदार हत्याराने हत्या केली. दरम्यान, हत्या करणारा फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना (३ जुलै)रोजी कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर एकवर घडली होती. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. अशोक लोदी असे हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर, नारायण मारावी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात सोबत कचरा वेचणाऱ्या सहकाऱ्याची धारदार हत्याराने हत्या केली, त्याबाबत माहिती देताना, पोलीस निरीक्षक शार्दुल वाल्मिकी हल्ल्यात नारायणचा जागीच मृत्यू
आरोपी अशोक लोदी व मृतक नारायण मारावी हे दोघे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सोबतच कचरा वेचण्याचे काम करीत होते. (3 जुलै २०२१)रोजी मृतक नारायण एका बाकड्यावर सकाळच्या सुमारास झोपला होता. त्यावेळी अशोक लोदीने नारायण मारावीला झोपतेच मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच, कचरा वेचन्यातून मिळालेल्या साडेतीनशे रुपयांवरून त्यासोबत वाद घातला. या वादातून अशोकने नारायणवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नारायण जागीच मृत्यू झाला.
हल्ला करणारा झाला गर्दीतून पसार
या घटनेनंतर आरोपी अशोक येथील गर्दीतून पसार झाला होता. मात्र, प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण थरार कैद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत, अशोक लोदीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचसह कल्याण जीआरपीने आरोपीचा शोध घेतला. अखेर, नऊ दिवसांनंतर अशोकला मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातून अटक करण्यात आली.