ठाणे- राज्यासह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून हळूहळू ठाण्यातील पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये भरती सुरू झाली आहे. एकप्रकारे ही चिंतेची बाब असून आतापर्यंत शहरातील कोरोनावर उपचार करणारे रुग्णालये 70 टक्के फुल्ल झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्हा प्रशासन आणि पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत असली तरी मात्र शहरात रुग्ण वाढीची संख्या झपाट्याने वाढत आहे.
पालिका प्रशासन योग्य उपाययोजना करत आहे. रुग्णांची संख्या वाढत असून काळजी करण्याचे कारण नाही, प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेल हा हेतू आमचा असून पालिकेने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पार्किंग प्लाझा येथेही 1 हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या औषधे, खाटा आणि रुग्णवाहिका तसेच लसीची कसलीही कमतरता नाही तरी लोकांनी करोनाचे नियम पाळावे, असे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी ठाणेकरांना केले आहे.