ठाणे - इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा कोट्यवधीचा अपहार करुन बांधकाम व्यावसायिक व स्टील व्यापाऱ्यांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. मानपाडा पोलिसांना ( Thane Manpada Police Station ) ही कामगिरी केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे वजनकाट्याला इलेक्ट्रॉनिक चीप लावून रिमोटव्दारे स्टीलचे वजन वाढविणाचा गोरखधंदा ही टोळी करत होती. या टोळीत इलेक्ट्रॉनिक इंजिनियरचा सहभाग असल्याचे समोर आले. या टोळीकडून आतापर्यत २ कोटी ८ लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करून टोळीतील ७ आरोपीना अटक केली आहे. ( Manpada Police arrests 7 accused )
५ टन स्टीलचे अपहार केल्याचे आले समोर -कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटीच्या नावाने हजारो गृहसंकुल उभी राहत आहेत. त्यातच बांधकाम व्यावसायीक मनिष नरेश पमनानी यांनी स्टील कंपनीला ४७ टनची आर्डर दिली होती. मात्र दुसऱ्या वजनकाट्यावर स्टीलचे वजन केले असता ५ टन स्टील कमी दाखवत होते. त्यामुळे त्यांनी ९ मे रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन ५ टन स्टीलचे अपहार झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी भादवि, कलम ४२०, ४६५, ४६८, ४०७, ३४ सह १२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरु केला. गुन्ह्याची पार्श्वभुमी पाहता आरोपी हे स्टीलचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजनकाटयाला इलेक्ट्रॉनिक चीप लावुन, रिमोटव्दारे आलेल्या मालाचे वजन वाढविण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले.
जालनामधील भंगार व्यावसायिकाला लोखंडाची विक्री -स्टील कंपनीकडून बांधकाम व्यावसायिकांकडे आलेले स्टील हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक व मालक यांना हाताशी धरुन कंपनीतून स्टीलचा माल निघाला. त्यानंतर त्यातील काही माल जालना शहरातील भंगार व्यावसायिकाला विकुन उर्वरीत माल हा वजनकाट्यावर आणला. यावेळी रिमोट कंट्रोलद्वारे मालाचे वजन वाढवून कमी प्रमाणात स्टील बांधकाम व्यावसायिक यांना पुरवुन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेत असल्याचे आढळून आले आहे.