ठाणे - अज्ञात नराधमानेसहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरालगतच्या कोनगाव परिसरात उघडकीस आला आहे. यानंतर आरोपीने संबंधित पीडित मुलीचा गळा आवळून खून केला असून, सरवली पाड्याजवळील पाईपलाईन येथील निर्जस्थळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या पीडितेचे आई-वडील हे मुळचे बिहार(नालंदा) येथील रहिवासी असून ते मोलमजुरीच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून सरवली येथील एमआयडीसीमध्ये स्थायिक झाले आहेत.
दिवाळीची सुट्टी असल्याने ती कुटुंबीयांसोबत घरात होती. मात्र, सायंकाळी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू झाला. शोध सुरू असतानाच सकाळी तिचा मृतदेह पाईपलाईन लगतच्या एका झुडपात आढळून आला.
या घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार संबंधित मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यानंतर कोनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहिता 363, 302, 201, 364, 366(अ), 376 यांसह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4, 8, 9(एच) 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सध्या एका संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.