ठाणे- रंगपंचमीआधीच एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या मुलांवर रंग व पाण्याने भरलेले फुगे फोडत होता. त्याला फुगे फोडण्यास १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने मज्जाव केला. याचा राग आल्याने १२ वर्षीय मुलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या पोटात चाकूने खुपसून गंभीर जखमी केल्याची घटना उल्हासनगरात घडली.
फुगे फोडण्यास मज्जाव; १२ वर्षीय मुलाने १६ वर्षीय मुलाच्या पोटात खुपसला चाकू - crime
या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात १२ वर्षीय विधीसंघर्षीत बालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी भिवंडी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

जखमी झालेल्या त्या मुलाचे नाव निशू (वय १६) असून त्याला उपचारासाठी व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. १ परिसरात हनुमाननगर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलांवर पाण्याने भरलेले फुगे फोडत होता. त्यावेळी निशू याने त्याला फुगे फोडण्यास मज्जाव करीत त्याला पोलिसांकडे तक्रार करेन असे सांगितले. याचा राग त्या विधीसंघर्षीत मुलाला आल्याने त्याने त्याच्या जवळील धारधार चाकूने निशू याच्या पोटावर वार करुन त्याला जखमी केले.