ठाणे - अंबरनाथ पोलीस ठाण्यात जगाआड असलेल्या चार आरोपींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यापूर्वीच अंबरनाथ पोलीस ठाण्यात तीन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झालेले आहेत. त्यामुळे आता हे चार आरोपी देखील कोरोना संक्रमित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सदर चारही आरोपींना न्यायालयाच्या परवानगीनंतर मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून अंबरनाथमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता २२ वर पोहचली आहे.
हेही वाचा...धक्कादायक..! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
अंबरनाथ शहराच्या दोन्ही बाजूला असलेल्या बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६९ आणि ७१ झाली आहे. असे असताना अंबरनाथ शहरात रुग्णांची संख्या कमी असल्याने समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसात अंबरनाथ शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. एकीकडे शहरात मुंबई येथे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी कोरोनासंक्रमित होत असताना दुसरीकडे शहरांतर्गत अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाधित झाले आहेत.