ठाणे - चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू सोडून स्नानगृह, स्वच्छतागृह, आणि किचनमधील असे १६ नळ काढून लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील शिवनेरी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात घरमालकाने नळ चोरीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
३१ हजार किंमतीचे नळ लंपास - पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार किशोर भाऊसाहेब जोंधळे (वय ५५) डोंबिवली पश्चिम भागातील शिवनेरी सोसायटीत कुटूंबासह राहतात. जोंधळे कुटूंब २८ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान काही कामनित्ताने बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तुटल्याचे दिसताच त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यानंतर घरात जाऊन पाहिले तर घरातील साहित्य चोरट्याने अस्ताव्यस्त फेकून दिले होते. तर जोंधळे यांची नजर घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि किचनमध्ये लावलेल्या नळाकडे गेली असता, ३१ हजार किंमतीचे नळ चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.