ठाणे - मांगूर मासा मानवी प्रकृतीसाठी घातक ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने या माशांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, बंदी असतानाही भिवंडी शहरात मंगुर मासे खुलेआम विक्री होत असल्याने त्यासंदर्भात विविध तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत आहेत. नागरिकांच्या या वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रतिबंधित मंगुर मासे विक्री करणाऱ्या दोन मासे विक्रेत्यांवर पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. मोहम्मद सलीम मोहम्मद शरीफ मोमीन व रहमान शेख असे कारवाई झालेल्या मासे विक्रेत्यांची नावे आहेत.
भिवंडीत बंदी असलेले १३० किलो मंगूर मासे महापालिकेने केले जप्त १३० किलो मंगूर मासे जप्त; मांगूर मासे विक्रेत्यांवर कारवाई करणार - बंदी असूनदेखील मंगूर मासे छुप्या पद्धतीने भिवंडी शहरातील बाजारात विकण्याकरता येत होते. याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी महापालिका प्रसाशनाकडे केल्यानंतर सोमवारी सकाळी तीनबत्ती येथील मच्छी मार्केटमध्ये मोहम्मद सलीम मोहम्मद शरीफ मोमीन व रहमान शेख हे दोन विक्रेते लपवून मंगुर मासे विकत असल्याचे आढळून आले. या दोन व्यापाऱ्यांकडून १३० किलो मंगूर मासे जप्त करून डम्पिंग ग्राऊंडमध्ये नष्ट करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही मासे विक्रेते व्यापाऱ्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, यापुढे मंगूर मासे विकल्यास शहरातील मासे विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली आहे.
22 जानेवारी 2019 रोजी शासनाने घातली बंदी - मांगूरचे उत्पादन घेताना माशांना कोंबड्यांचे, कत्तलखान्यात कुजलेली शेळी, मेंढी, म्हशी इत्यादींचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते व हा मासा मानवी प्रकृतीसाठी घातक आहे. यावर राष्ट्रीय हरित लवाद यांनी (22 जानेवारी 2019)च्या निर्णयाद्वारे शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय माजी मंत्री अस्लम शेख यांनी मांगूर मत्स्य उत्पादक व मत्स्य वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई, तसेच मागूर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मांगूर माशाचे उत्पन्न - पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या मांगूर जातीचे माशाची प्रजाती नष्ट करण्याचे आदेश केंद्र सरकारने 19 डिसेंबर, 1997 रोजी दिले. राज्य सरकारनेही आयुक्त, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील उपायुक्त मत्स्यव्यवसायांना 16 जून, 2011 रोजी मांगूर माशांच्या प्रजाती नष्ट करण्याबाबतचे आदेश दिले. पण, या विरोधात 2018 मध्ये हरित लावादात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचाही निकाल सरकारच्या बाजूने लागला. मांगूर हा माणसाच्या जीवनाला तसेच पर्यावरणाला घातक असणारा मासा आहे. त्याची मत्स्यबीज केंद्रे आणि त्याचा तलावातील मत्स्यसाठा संपूर्णपणे नष्ट करण्याबाबतचा आदेश असतानाही भिवंडीमध्ये मुंबई-नाशिक महामार्गाच्या बाजूला नदी किनारी व वन विभागाच्या 150 एकर जमिनीवर 126 पेक्षा जास्त तलाव आढळले होते. त्यावेळी या तलावातील मासे नष्ट करून तलाव बुजवण्यात आले होते.
हेही वाचा -'शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं...'; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान