ठाणे -दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमासाठी भिवंडीतून काही नागरिक सहभागी झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 15 जणांनी दिल्लीहून ट्रेनने प्रवास केलाय. त्यातील नऊ जणांना दिल्लीत क्वारंटाईन करण्यात आले असून अन्य चौघांना भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात हलवण्यात आले आहे. मात्र, यातील दोघांचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती, भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध आणले आहे. मात्र यानंतरही दिल्लीत तबलिगी जमातीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये विदेशी नागरिकांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे तेलंगाणात काही दगावले आहेत.