ठाणे -शहर आणि परिसरात कोरोनाची साथ आटोक्यात आणता यावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित यंत्रणांच्या बैठका घेत आहेत. तसेच प्रशासन आणि शासनाच्या प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने स्वतः आघाडीवर राहून कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व करत आहेत. ठाण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, उभारण्यात येत असलेल्या 1 हजार खाटांच्या तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा...असं काय घडलं....लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोचा केला खून, नंतर स्वत:ही घेतली फाशी
पालकमंत्री शिंदे सध्या कोविड रुग्णालये आणि क्वारंटाईन केंद्रांना सातत्याने भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवरील उपचारांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला गेला होता. या रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा शिंदे यांनी आज घेतला. या रुग्णालयात ५०० खाटा विनाऑक्सिजन तर ५०० खाटा ऑक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असणार आहेत. याशिवाय १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलिसिस सेंटर, तपासणी लॅब आदी अद्ययावत सुविधा येथे असणार आहेत.