सोलापूर- स्मार्ट सिटीच्या कामाचा बोझा शहरवासियांना सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कासव गतीने चालू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहरातील नागरिक वैतागून गेले आहेत. जागोजागी खोदकाम आणि खड्डे केले आहेत. शेवटी आज बुधवारी युवक पँथरच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सतनाम चौक येथील मोठ्या खड्ड्यात होमहवन (यज्ञ) करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सोलापूर शहरातील प्रत्येक चौकात आणि गल्ली बोळात पाईप लाईन, ड्रेनेज लाईनसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. रस्त्यावरील पाईप लाईनचे काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नाही. सदर कामाची मुदत संपलेली आहे, तरीदेखील आजतागायत काम पूर्ण झाले नाही. या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात वाढले आहेत आणि वाहनधारकांना पाठीचा त्रास, मणक्यांच्या त्रास जाणवू लागला आहे.