सोलापूर- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशातील पहिल्या वीस स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झालेला आहे. तरीही स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये खड्डेच खड्डे पडलेले असल्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावून वृक्षारोपण करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
प्रतिक्रिया- विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस, युवक काँग्रेस आणि अंबादास करगुळे, शहर अध्यक्ष, युवक काँग्रेस स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट चौक म्हणून सोलापूर शहरातील रंगभवन चौक विकसित केला जात आहे. रंगभवन चौकाच्या सुशोभिकरणावर कोट्यवधी रूपये खर्च करून या चौकाला स्मार्ट करण्यात येत आहे. मात्र तरीही चौकाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
सोलापूर शहरातील अनेक ठिकाणच्या वर्दळीच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडलेले असताना महापालिकेतील सत्ताधारी परस्परांमधील भांडण करत आहेत. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना खड्ड्यांची माहिती व्हावी यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांनी रंगभवन चौकातील खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावून वृक्षारोपण केले आणि अनोखे आंदोलन केले.
मागील काही महिन्यापासून रंगभवन चौकाच्या आजूबाजूला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. काम संपल्यानंतर हे खड्डे बुजवण्यात येत नाहीत. त्यामुळे त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. स्मार्ट काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे कितीतरी महिने सोलापूरकरांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे .या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेशरमाची झाडे लावून हे आंदोलन केले आहे.