पंढरपूर -पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वर्धा जिल्ह्यातील महिला भाविक कांताबाई भुते या पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन घेऊन चंद्रभागा तीरावरील दगडी पुलावरून जात होत्या. मात्र कांता भुते यांचा तोल गेल्याने गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रात पडल्या. चंद्रभागेच्या पात्रात कांता भुते यांनी रात्रीच्या अंधारात सहा तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र एक कोळी समाजातील युवकाचा आवाज ऐकला त्यानंतर कोळी बांधवांनी एकत्र येत महिलेचे प्राण वाचवले.
चंद्रभागा नदी पात्रात तब्बल सहा तास मृत्यूशी झुंज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षापासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र येत्या 20 जुलै रोजी पांडुरंगाचा आषाढी सोहळा पार पडणार आहे. त्यावर राज्य शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी व वारी पोहोच करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कांता भूते हे आपल्या घरच्यांसोबत पंढरपुरात आल्या. विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले व चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी चंद्रभागेकडे आल्या. जुना दगडी पुलावरून चालत असतानाच त्यांचा तोल जाऊन त्या पाण्यामध्ये पडल्या आणि पाण्याची खोली व पोहता येत नसल्याने तेथेच असलेल्या दगडाला त्या धरून बसल्या व मदतीसाठी सायंकाळच्या सहा वाजल्यापासून आवाज देत होत्या. मात्र त्यांचे आवाज कोणीही ऐकले नाही. जुन्या दगडी पुलावरून माणसांची व वाहतुकीची वर्दळ रात्रीच्या सुमारास कमी असते.