सोलापूर - उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंदन सुरू ( Ujani Dam Issue ) होते. मात्र, आता धरणातील पाणी हे पुणे जिल्हातील बारामती आणि इंदापूरकडे वळवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात याविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. त्यानिमित्ताने उजनीच्या पाण्याबाबत घेतलेला आढावा...
यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी -महाराष्ट्रातील अनेक कोयना, जायकवाडी यासारखी मोठी धरणे आहेत. तसेच, उजनी हे प्रमुख धरण आहे. कृष्णा नदीची उपनदी असलेल्या भीमा नदीवर धरण बांधण्याचा आराखडा सर्वात पहिल्यांदा एका ब्रिटीश अभियंत्याने १९०२ साली तयार केला होता. त्या ब्रिटीश अधिकाऱ्याचे नाव होते एफ.एच.बोवेल. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1960 साली महाराष्ट्र देखील वेगळे राज्य झाले, अन् त्याचे मुख्यमंत्री बनले यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांनी ७ मार्च १९६४ साली पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माढा तालुक्यात उजनी धरणाची पायाभरणी केली. "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे," असे कुदळ मारताना यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं. त्यानंतर १९८० साली ह्या धरणाचे काम पूर्ण झाले. १९८४ सालापासून उजनीत पाणीसाठा होऊ लागला. धरणाची पाणीसाठी क्षमता १२३ टीएमसी. उपयुक्त पाणीसाठा ५४ आणि मृतसाठा ६३ तर, अतिरिक्त पाणीसाठा ६ टीएमसी आहे. धरणाची सुरुवात झाल्यानंतर दुष्काळी असलेला सोलापूर जिल्ह्यात कृषीक्रांती झाल्याने शेतकऱ्यांची भरभराट झाली. उजनीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी उस, फळबागा यांसारख्या पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी आणि खाजगी कारखाण्यांची उभारणी झाली.
अद्यापही 'या' भागातील योजना अपुऱ्या -सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला आणि पिण्यासाठी पाणी हा उजनी धरण निर्मितीचा मुळ उद्देश होता. त्यातध्ये शेतील बारामाही पाणी देण्यात येत असे. मात्र, ते शक्य नसल्याने ८० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बारामाहीच्या व्यतिरिक्त आठमाही सिंचन योजना सुरु केली. त्याने दक्षिण सोलापूर, मंगळवेढा आणि अक्कलकोट सारख्या तालुक्यांना पाणी मिळण्याचा मार्ग खुला झाला. पण, अपुऱ्या सिंचन योजना, पाणीपुरवठ्यामुळे अद्यापही येथील परिसरात पाणी पोहचले नाही. तसेच, जिल्ह्यातील आष्टी, शिरापूर, सीना माढा, या उपसा सिंचन योजनेसह अनेक योजना अपुऱ्या आहेत. तसेच, सोलापूर शहर, मोहोळ आणि अन्य तालुक्याचा पाणी प्रश्न तसाच लटकला आहे. त्यातच बारामती आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे.