सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा आखाडा काल १८ एप्रिलला संपला अन् आज हनुमान जयंतीनिमित्त खऱ्या कुस्त्यांचा आखाडा मोहोळ तालुक्यातल्या कुरुलमध्ये रंगला. या मैदानात कुरुलचाच विकास धोत्रे हा मल्ल विजेता ठरला. त्याला चांदीची गदा आणि ७५ हजार रुपये रोख देण्यात आले.
या आखाड्याच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेणारे राजकीय नेते कुस्ती आखाड्यात खिलाडूपणे सहभागी झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्व असलेल्या गावांत पुन्हा एकदा एकोपा निर्माण झाला. म्हणून गावांत कुस्तीला विशेष महत्व आहे.
गेल्या शंभर वर्षांपासून येथे कुस्त्या आयोजित केल्या जातात. सुरुवात १०० रुपयांच्या लहान मल्लांपासून शेवटची कुस्ती ७५ हजारांची असते. राज्यभरातील नामांकित मल्ल या आखाड्यात हजेरी लावतात. त्यामुळे कुरुलच्या कुस्ती आखड्याचा नावलौकिक आहे.
या फडात सर्वच स्तरातील नागरिक आणि सर्वच राजकीय पक्षाचे नेते आपले राजकीय मतभेद विसरून कुस्तीला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गावात राजकारणाच्या पलीकडे कुस्तीचा रगेल आखाडा अजूनही टिकून असल्याचे आखाड्याचे संयोजक रमेश जाधव यांनी सांगितले. तसेच गावात खेळताना लोकांचे जितके प्रेम असते त्याहीपुढे जिंकण्याच्या अपेक्षांचा दबाव असतो, असे कुरूल केसरी विजेता विकास धोत्रे म्हणाला.