सोलापूर- अत्यंत छुप्या पद्धतीने भाजीचे कॅरेट समोर लावून आतमध्ये वाहनात गाई लपवून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चारचाकी पीकअप वाहनाला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
वाहन चालकाने अतिशय चलाखीने व हुशारीने गाई लपवल्या होत्या. संशय येऊ नये म्हणून सर्व बाजुंनी भाजी व फळांचे कॅरेट लावले होते.
पण, पोलीस व गोरक्षकांनी हा डाव हाणून पाडला व तीन गाई सोडवून वाहनचालकावर व त्यासोबत असणाऱ्या एका जोडीदाराला अटक करून दोघांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी रात्री 3 गाई पकडण्यासाठी सापळा लावला होता. पिकअप (एमएच 13 सीयु 0411) वाहनातून दहिटणेकडून शेळगीकडे येत असताना ही कारवाई झाली.
गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने गाई शोधून काढल्या. वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. त्या वाहनात पूर्णपणे भाजीचे, फळांचे कॅरेट होते. कोणासही संशय येऊ नये म्हणून भाजीचे कॅरेट लावण्यात आले होते. त्यामागे 3 गायींना अत्यंत निर्दयीपणे बांधून खाली बसवण्यात आले होते.
तीनही गाई जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेत दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. इम्तियाज लालसाब सय्यद (वय 40 रा, बेगम पेठ, सोलापूर), शकील बशीर तांबोळी(वय 19 रा, मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास पोलीस नाईक राठोड करत आहेत. अखिल भारत कृषी गोसेवा सुधीर बहिरवडे यांनी याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे.