सोलापूर - वंचित बहुजन आघाडीकडून महावितरण कार्यालयासमोर वीज बिल परत घ्या, वीज बिल माफ करा, अशा जोरदार घोषणा देत वीज बिलांची होळी करण्यात आली. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुरारजी पेठ येथील महावीतरणाच्या मुख्य कार्यालय समोर आंदोलन झाले. पोलिसांनी वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोब ताब्यात घेत कारवाई केली.
सोलापूर शहरात एकूण 2 लाख 7 हजार वीज ग्राहक आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने सोलापूर सह देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे हातावर पोट असणारे कामगार, छोटे-मोठे व्यवसाय करणारे ,धुणी भांडी करून उपजीविका करणारे महिला, बांधकाम क्षेत्रातील कामगार, ऑटो रिक्षा चालक, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, वस्ताद, रस्त्यावर बसून भाजी व फळे विकणारे महिला, यांची लॉकडाऊनमध्ये मोठी फरफट झाली आहे. गेले सहा महिन्यांत लॉकडाऊनमुळे जनजीवन कोलमडले आहे. या लॉकडाऊनमुळे या व्यावसायिक व कामगारांजवळ एक पै देखील शिल्लक राहिली नाही. ही लोकं कर्जबाजारी झाली आहेत. लाईट बिले भरण्यासाठी सक्षम नाहीत.