सोलापूर - पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र, चंद्रभागा नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याने याला गालबोट लागले. नागपूरहून ( Nagpur ) पंढरपूरला ( Pandharpur ) तीन तरुण आषाढी वारीला विठ्ठलाच्या दर्शनासठी आले होते. यातील दोन तरुणाचा चंद्रभागा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा जि नागपूर) व विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी जि नागपूर) असे मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात ( Pandharpur Government Hospital ) शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले आहे.
एकमेकांना वाचविताना दोघांनी गमावले प्राण -नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील जलालखेडा व नारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपूर येथे पोहोचले. विठूरायाच्या दर्शना अगोदर अंघोळ करावी असे मित्रांनी ठरवले. सचिन कुंभारे व विजय सरदार हे दोघे अंघोळीसाठी चंद्रभागा नदी पात्रात उतरले. परंतु, पाणी जास्त असल्यामुळे सचिन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला विजयसुद्धा पाण्यात बुडाला.
नागरिकांचे प्रयत्न व्यर्थ -सचिन व विजय हे दोघे मित्र वाहत असल्याचे नदी पात्राबाहेर उभ्या असलेल्या मित्राला दिसले. त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी बचावाचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी नदीत उडी घेत दोघांना वाचण्याचा प्रयत्न केला. सचिन व विजय यांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.