सोलापूर -शहरातील दोन व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेने गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केले आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतुस आणि एक चारचाकी कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यासिन अब्दुल जब्बार कामतीकर(वय 32 वर्ष रा.सगम नगर, हैदराबाद रोड सोलापूर) व समद उर्फ अलीम उर्फ अल्लू मकडूम शेख(वय 34 वर्ष रा,काळी मशीद जवळ, उत्तर कसबा, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
एका गुप्त बातमीदाराने दिली पोलिसांना माहिती-
गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली होती. दोन व्यक्ती हे एका कारमधून गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन शहरात फिरत आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैदराबाद रोडवरील सगम नगरजवळ सापळा लावला. राखाडी रंगाच्या कारमध्ये आलेल्या दोन संशयित आरोपींना ताबडतोब सापळा लावून घराडा घालून पकडण्यात आले. त्यांची विचारपूस केली. झडती घेतली असता यासिन कामतीकर याच्या खिशात पिस्तुल आढळून आले. तर समद शेख याच्या खिशात तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी या दोन संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पिस्तुल आणली कुठून याचा तपास सुरू-
सोलापूर शहरातील या दोन व्यापाऱ्यांनी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे कुठून आणली आणि यांचा उद्दिष्ट काय होता, याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. पोलिसांनी एकूण 6 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, पीएसआय शैलेश खेडकर, अशोक लोखंडे, शंकर मुळे, राजू चव्हाण, विजय वाळके, संदीप जावळे, संतोष येळे आदींनी केली.