सोलापूर -कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सोलापुरात भयंकर रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. आता रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यासोबत रक्त तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात फक्त एक आठवडा रक्त पुरेल इतक्याच रक्ताच्या बॅग शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती गोपाबाई दमानी ब्लड बँकेच्या प्रशाकीय अधिकाऱ्यांनी दिली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या रक्तपेढीत रक्ताचा बॅगा शिल्लक नाहीत. सोलापुरातील खासगी व सरकारी रुग्णालये कोरोना रुग्णांनी खचाखच भरले आहेत. या रुग्णांना रक्ताची गरज पडल्यास भयंकर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
कोविड लसीकरणाचा देखील परिणाम-
कोविड लसीकरण मोहिमेचा देखील रक्त संकलनावर फरक पडला आहे. कारण सरकार तर्फे एक जनजागृती केली जात आहे. लसीकरण केलेल्या नागरिकांनी 1 ते 2 महिन्यापर्यंत रक्तदान करू नये. पण याचे परिणाम रक्तसाठ्यावर होत आहे.दर महिन्याला तीन हजार ते चार हजार रक्ताचे बॅग लागतात. पण सध्या एक हजार बॅगच शिल्लक आहेत. अत्यावश्यक असलेल्या रुग्णांसाठी एक आठवड्यानंतर रक्त मिळणार नाही.
सर्व प्रकारच्या रुग्णांना रक्ताची गरज-
सध्या कोविड रुग्णांचा विचार केला जात आहे. पण रक्त हे सर्व प्रकारच्या रुग्णांना लागत आहे. त्यामध्ये अपघात, प्रसूती आदी रुग्णांना रक्ताची गरज पडत आहे. सर्व रुग्णांना रक्त उपलब्ध करून द्यावयाचा असल्यास दररोज शंभर जणांनी रक्तदान करणे आवश्यक आहे.