पंढरपूर -सोलापूर-पुणे महामार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करत असताना अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. चुकीच्या पद्धतीने जमिनीचे अधिग्रहण केल्यामुळे माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी पंढरपूर येथील भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर भारतीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी जमीन अधिग्रहण व महामार्गाचे असणारे चालू काम बंद करण्याची लेखी निवेदन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांचे प्राधिकरण कार्यालयात एका दिवसाचे ठिय्या आंदोलन
पंढरपूर आळंदी महामार्गाचे काम सध्या जोरदार गतीने चालू आहे. या कामासाठी माळशिरस तालुक्यातील खुडूस, डोंबाळवाडी, धर्मपुरी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. मात्र या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करत असताना अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला होता. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर जमिनी अधिग्रहण त्रुटी आढळल्यानंतर माळशिरस प्रांत अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही दक्षता घेतली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले.