सोलापूर -आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यातील परिचारिकांनी बेमुदत कामबंद केले आहे. कामबंद केल्याने शासकीय रुग्णालयातील कामकाज व रुग्णसेवा ठप्प झाली आहे. खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचारिकांनी तीन दिवसीय आंदोलन केले होते. यानंतर 26 व 27 मे रोजी कामबंद आंदोलन झाले. मात्र यावर तोडगा न निघाल्याने शनिवारपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याध्यक्ष मनीषा शिंदे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.
Nurses Strike in Solapur : सोलापुरातील परिचारिकांचे कामबंद आंदोलन; शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प
विविध मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यातील परिचारिकांनी बेमुदत कामबंद केले आहे. कामबंद केल्याने शासकीय रुग्णालयातील कामकाज व रुग्णसेवा ठप्प झाली आहे. खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचारिकांनी तीन दिवसीय आंदोलन केले होते. मात्र, तोडगा न निघाल्यामुळे आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सोलापूरसह राज्यातील 30 हजार परिचारिकांनी केले कामबंद-सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील जवळपास 400 व ई एस आय हॉस्पिटलमधील 50 असे 450 परिचारिकांनी कामबंद केले आहे. या कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील 30 हजार परिचारिकांनी कामबंद केले आहे. सोलापूर शासकीय रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनाच सर्व कामे स्वतःच करावी लागत आहेत. सिव्हिल प्रशासनाने डॉक्टरांवर जबाबदारी दिली आहे. मात्र डॉक्टराना परिचरिकांची जबाबदारी सांभाळणे अवघड होत चालले आहे.
या आहेत मागण्या -शासनाने कंत्राटी पद्धतीने परिचरिकांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे.कायमस्वरूपी पदभरती करावी ही प्रमुख मागणी आहे.केंद्र शासन प्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करणे. गेल्या पन्नास वर्षांपासून गणवेष भत्त्यात वाढ केली नाही केंद्र सरकार प्रमाणे गणवेश भत्ता मंजूर करावा. शैक्षणिक भत्ते देण्यात यावे. अशा अनेक मागण्या घेत, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचरिकांनी बी ब्लॉक समोर आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वीही शासनाकडून तात्पुरत्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले होते.मात्र आश्वासनकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता लेखी आश्वासना नंतर कामावर परत येणार नाही अशी भूमिका परिचरिकांनी घेतली आहे. या आंदोलनात आशा माने, शशिकांत साळवे, विरेश महाजनी, मीरा सर्वगोड, संध्या जाधव, संध्या गावडे, आशा कसबे आदी उपस्थित होते.