सोलापूर (पंढरपूर) - राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत धार्मिक स्थळे बंद केली आहेत. त्यामुळे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरसुद्धा बंद आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेची 23 एप्रिलला होणारी चैत्र वारी रद्द करण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने अकराशे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला आहे. 20 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत हा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
भाविकांना पंढरपूरमध्ये येण्यास बंदी -
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 5 एप्रिलपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद केली आहेत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर 5 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. 23 एप्रिलला होणारी चैत्री यात्रा प्रतीकात्मक स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. मात्र, परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंड्या व सर्व पायी येणाऱ्या वारकरी व भाविकांना या काळात बंदी घालण्यात आली आहे. चैत्र वारी निमित्त पंढरपुरात भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.