सोलापूर - भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी प्रवेश कार्यक्रमात सांगितले होते, की माझ्या मागे ईडी चौकशीचा भुंगा लागेल आणि जेव्हा ईडी येईल तेव्हा मी सीडी लावेन, असे वक्तव्य केले होते. आता ईडीची नोटीस आली आहे. आता खडसे कोणती सीडी आणतात हे बघण्याची उत्सुकता आहे, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांनी सांगितले आहे.
मागील सहा-सात वर्षांपासून ईडीचा ट्रेंड
भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसबाबत बोलताना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले, की ईडीचौकशी लावणे हा मागील सहा-सात वर्षापासून एक नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. कुणी राजकीयदृष्ट्या थोडाजरी आपल्या विरोधात गेला, तर त्याच्या विरोधात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स चौकशी लावायची आणि त्यांना अडचणीत आणायचे हे आपण मागील सहा-सात वर्षांपासून पाहत आहोत.
'...म्हणून शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्ये'
असंवेदनशील नेतृत्व भारतीय जनता पार्टीत तयार होत चालले आहे. सत्तेची मस्ती आणि सत्तेची गुर्मी चढत असल्याने शेतकऱ्यांबाबत अशी बेताल वक्तव्य भाजपा नेते करत आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पीयूष गोयल आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सत्यजित तांबे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपा मंत्र्यांनी शेतकऱ्यांची व्यथा बघण्याऐवजी टुरिस्टप्रमाणे फिरू नये, यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न समजणार नाहीत, असे ही तेम्हणाले.