सोलापूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने लालपरीची चाके थांबली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यातील एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहे. अनेक प्रवाशी अडकून पडले आहे. वडापवाले मात्र प्रवाशांची लुटालूट करत आहेत. राज्य शासनात विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली असून सोमवारी 8 नोव्हेंबरपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व आगार बंद करण्यात आले आहे. एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना याची झळ बसत आहे. खासगी वडापवाले अव्वाच्यासव्वा दरात भाडे आकारून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत आहेत.
राज्यभर आंदोलन सुरू झाले असून 24 जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी याला पाठिंबा दर्शविला आहे. कोणत्याही एका संघटनेचे हे आंदोलन नसल्याची माहिती यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील 250 एसटी आगारापैकी फक्त 25 आगारातूनच बससेवा सुरू आहे.
सोलापुरातील सर्व आगारातील एसटी सेवा ठप्प
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 12 दिवसापासून आंदोलन सुरू केले होते. सोमवारी 8 नोव्हेंबरपासून आंदोलन आणखीन तीव्र करत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बस स्थानक बंद करण्यात आले आहे. हजारो प्रवाशी ताटकळत बस स्थानकात थांबले आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, अकलूज, माळशिरस, आदी तालुक्यातील प्रवाशी ताटकळत सोलापूर बस स्थानकावर थांबले आहेत.
दिवाळी सुट्ट्या संपल्या मात्र एसटी बसेस बंद