सोलापूर- एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात ( ST Workers Strike ) सहभागी व्हायचे आहे, असे सांगून वडिलांनी घर सोडले. त्यानंतर राहत्या घरी मुलाने आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा ( ST employees son suicide in Solapur ) संपविली. ही दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. अमर तुकाराम माळी ( वय २० वर्षे, रा. कोंडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा दुर्दैवी प्रकार बुधवारी (दि. १९ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडला.
अमर माळी या तरुणाने दयानंद महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या काही दिवसापासून अमर घरात शांत बसत होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली होती. वडिलांनी माझे काम दोन-तीन महिने झाले बंद आहे. मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे मुलाला उत्तर दिले होते.
वडील एसटी संपात गेले आणि मुलाने गळफास घेतला-
अमरचे वडील एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ( ST Employees strike in Solapur ) ठिकाणी गेले. अमर हादेखील घराबाहेर गेला. त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची चुलती जेवण करत होती. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला. मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही. त्यामुळे आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता, आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला. शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.