सोलापूर :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2021-22 च्या अंदाजपत्रकामध्ये 239 कोटी 46 लाख 64 हजार इतकी जमा रक्कम गृहीत धरून, 278 कोटी 97 लाख 52 हजार इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास अधिसभेची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये 39 कोटी 50 लाख 88 हजार इतकी तूट दर्शवली आहे.
सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेचे सचिव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी काम पाहिले. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर केला. यावेळी सभेचे सदस्य डॉ. एस. के. पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केले.
विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर..
या अंदाजपत्रकाचे पाच भागात विभाजन करण्यात आले होते. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून हा अंदाजपत्रक राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महेश माने यांच्या अध्यक्षतेखाली गठित उपसमितीने तयार केले होते. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून अत्यंत पारदर्शी असा हा अर्थसंकल्प असल्याचे विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा यांनी म्हटले आहे.
अधिसभेच्या या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषय यशस्वीरीत्या मंजूर झाले. अनेक रखडलेले विषय सर्वानुमते मान्य झाले. हा विद्यापीठाचा वाढता आलेख आहे व काही ठिकाणी खर्च कमी करून प्रशासन चांगले कार्य करीत आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ सरवदे, डॉ. गजानन धरणे, सचिन गायकवाड यांच्यासह अनेकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी अंदाजपत्रकात भरपूर तरतुदी..
- विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेसाठी 12 लाखांची विशेष तरतूद.
- विद्यार्थी व शिक्षकांच्या संशोधनासाठी प्रेरणा मिळण्याकरिता प्रत्येक संकुलासाठी फेलोशिपची तरतूद.
- विद्यापीठ परिसरात स्पर्धा परीक्षा अभ्यास कक्षासाठी एक लाखाची तरतूद.
- रुसा रिसर्च इनोव्हेटिव हबसाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद.
- नवीन प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनसाठी 54 कोटी 50 लाखांची तरतूद.
- ग्रंथालय विकासासाठी 16 लाखांचा निधी.
- वृक्ष संवर्धनासाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद.
- रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पाच लाखांची तरतूद.
- विद्यापीठ शिक्षक व कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी 20 लाखांची तरतूद.
- विद्यार्थी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी विशेष तरतूद.
- विद्यार्थ्यांसाठी क्षमता संवर्धन कार्यक्रम राबविण्याकरिता विशेष तरतूद.
- विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या स्वच्छता जनजागृतीकरिता विशेष तरतूद.
- इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजकरिता एक कोटी रुपयांची भरघोस तरतूद.
- उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरण अंतर्गत परदेशी सहयोगी क्रियाकलाप यासाठी विशेष तरतूद.
- विद्यापीठ परिसरातील 40 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता पुस्तके कायम स्वरूपी भेट देण्याकरिता विशेष तरतूद.
- महाविद्यालयीनस्तरावर तणावमुक्तीचे समुपदेशनपर व्याख्यान आयोजित करण्यासाठी विशेष तरतूद.