महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन; खड्ड्यामध्ये आकाशदिवा लावून केली दिवाळी साजरी

स्मार्ट सिटीच्या नावाखाली जागोजागी शहरात मुख्य रस्त्यांवर खड्डे काढण्यात आले आहेत. तर ज्या ठिकाणी खड्डे आहेत, ते बुजवले देखील जात नाहीत. त्यामुळे शहर प्रशासनाचा निषेध व्यक्त करुन संभाजी ब्रिगेडने खड्ड्यातच आकाशदिवा लाऊन दिवाळी साजरी करत अनोखे आंदोलन केले.

Solapur Sambhaji Brigade protest by celebrating Diwali in pit holes on road
सोलापूर संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन; खड्ड्यांमध्ये आकाशदिवा लावत केली दिवाळी साजरी

By

Published : Nov 15, 2020, 8:08 AM IST

सोलापूर - शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे, हे खड्डे बुजवले जावेत यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमध्येच आकाशदिवा लावत संभाजी ब्रिगेडने दिवाळी साजरी केली.

सोलापूर संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन; खड्ड्यामध्ये आकाशदिवा लावत केली दिवाळी साजरी

गेल्या अनेक दिवसापासून विजयपूर महामार्गावरील पुलावरील होणारी जड वाहतूक जुळे सोलापुरातील रेल्वे पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे जड वाहतुकीमुळे या पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डा चुकवताना अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, आसरा पूल अत्यंत अरुंद असल्याने पुलाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी, दिले आश्वासन..

गेल्या रविवारी सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी,आयुक्त पी शिवशंकर महापौर कांचना यन्नम, डीआरएम शैलेश गुप्ता आणि या भागातील नगरसेवकांनी पाहणी केली होती. यावेळी आयुक्तांनी तात्काळ दोन दिवसात या पुलावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आठ दिवस झाले तरी खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आसरा पुलावर खड्ड्यामध्ये आकाशदिवे लावत दिवाळी साजरी करून महानगर पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

जड वाहतुकीने आणखी दुरावस्था..

शहराला रिंग रोड नसल्याने जड वाहतूक शहराच्या मधोमध मुख्य मार्गावरून जाते. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांनी अनेक जणांचे बळी घेतले आहेत, तरीदेखील प्रशासनाला जाग आली नाही. जुळे सोलापूर, आसरा चौक, लक्ष्मी मार्केट, दत्त चौक, अशोक चौक या भागात खड्डेच खड्डे झाले आहेत. तसेच, आसरा पुलावरही जड वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार निवेदन दिले तरी देखील खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने असे अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा :चेनस्नॅचिंग प्रकरणतील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; चौकशीत आणखी गुन्ह्यांचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details