सोलापूर - एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आषाढी एकादशीच्या ( Ashadi Ekadashi ) महापूजेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यातील त्यांच्या पहिल्या एन्ट्रीलाच मोठे राजकीय भगदाड पडले आहे. शिवसेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते, शिवसेनेचे बडे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नेत्यांनी, नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. एका अर्थाने आजच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय उलथापालथीचे सूतोवाच मिळत आहेत. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे गणिते बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर शहराचा दौरा नसताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सायंकाळी युवा सेना संपर्क प्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाला भेट दिली.
सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री यांची भेट-शिवसेनेचे सोलापूर महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, एकनाथ शिंदे, आमदार तानाजी सावंत यांच्या भेटीनंतर अमोल शिंदे यांनी आपला गट बदलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे सोलापुरातील शिवसेनेला पहिले खिंडार पडले आहे. शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांची उद्धव ठाकरे यांनी पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यामुळे आमदार सावंत यांना मानणारा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होणार हे स्पष्ट आहे.
या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट-माजी महापौर महेश कोठे, महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उमेश गायकवाड, मनोज शेजवाल, प्रथमेश कोठे, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, माजी शहरप्रमुख हरीभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के, माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे, संजय कोकाटे, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, पंढरपूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्वागत केले.