सोलापूर- ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम येथून रवाना होईल त्यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यालादेखील प्राणवायू देऊन पुढे जाण्याची शक्यता आहे. ही माहिती गुरुवारी सायंकाळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. उद्या दुपारी ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू महामारीवर संयुक्त बैठक झाली. या बैठकीत रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि बेड या विषयावर चर्चा करण्यात आली. सोलापूर महानगरपालिका पी. शिवशंकर यांनी एक्सप्रेसमधून ऑक्सिजनची मागणी करू असे म्हटले आहे. मध्य रेल्वेचे डीआरएम शैलेंद्र गुप्ता व तसेच राज्य शासनासोबत बोलणे सुरू असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
ऑक्सिजन एक्सप्रेसमधून सोलापूरलादेखील ऑक्सिजन मिळण्याची शक्यता हेही वाचा-'केंद्राने रेमडेसिवीर वाटपाचे नियमन स्वत:कडे घेतले, राज्याला इंजेक्शनचा कमी पुरवठा होणार'
ऑक्सिजनविना कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न-
राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा मनपा आयुक्त शिवशंकर यांनी व्यक्त केली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णालय गच्च भरली आहेत. ऑक्सिजनची रुग्णांना मोठी गरज आहे. ऑक्सिजनविना कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासकीय अधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा-नाशिक : ऑक्सिजनसह रेमडेसिवीर तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार - पालकमंत्री
सोलापुरातील रेल्वे कोचमध्ये आयसोलेशन वार्ड सुरू होणार-
शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. कोविड रुग्णांनी शहर आणि जिल्ह्यातील खासगी आणि प्रशासकीय रुग्णालये खचाखच भरली आहेत. रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. यासाठी सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाकडून बाळे येथील रेल्वे स्थानकावर आयसोलेशन कोच उभे करण्यात येणार आहे. या ठिकाणी 308 कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोनाचे 308 रुग्ण या रेल्वे कोचमध्ये दाखल झाल्यास सोलापुरातील विविध रुग्णालयातील भार कमी होणार आहे. वीज, पाणी आणि ऑक्सिजनसाठी सोलापूर महानगरपालिकेसोबत विविधस्तरावर बैठक सुरू आहेत. लवकरच रेल्वे कोच मध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.