सोलापूर - नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. नंदी ध्वज (मानाच्या काठ्या) घेऊन 68 लिंगांना तैल अभिषेक करण्यात आले. सिद्धेश्वर महायात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून सिद्धेश्वर महायात्रा सुरू झाली. परंतु, कोरोना महामारी किंवा ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी फक्त पन्नास जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. मंदिर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा -Omicron In Solapur : सोलापूरकरांची चिंता वाढली.. ओमायक्रॉनचा शहरात शिरकाव.. पहिला रुग्ण आढळला
सिद्धेश्वर महायात्रा पोलीस बंदोबस्तात प्रारंभ-
उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यात काल मंगळवारी रात्री बारा वाजता मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास सांज चढवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू व राजशेखर देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. बुधवारी सकाळी आठ वाजता सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात नेऊन ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगाजवळ विडा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
13 जानेवारी रोजी संमती कट्ट्याजवळ सात नंदीध्वजांच्या साक्षीने अक्षता सोहळा होईल. 14 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हळद काढण्याचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी होम मैदानावर होम विधीचा कार्यक्रम होणार आहे.