सोलापूर - चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरु का बडा महत्व होता है, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले ( Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement ) होते. त्याविरोधात महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोलापुरात शिवसेना आक्रमक झाली असून आज (सोमवारी) शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन ( Dharne Andolan Shivaji Chowk ) करण्यात आले. राज्यपाल महाराष्ट्र राज्यात जिथे जिथे जातील त्यांना शिवसेना विरोध करेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे राज्यपालांचे विधान?
समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला रविवारी प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. (Governor on Shivaji Maharaj ) आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते. चाणक्य नसते तर चंद्रगुप्त मौर्य नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे, समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे, असे विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.