सोलापूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यभरातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तेव्हापासून सोलापुरातील खासगी व सरकारी शाळांना कुलूप होते. गेल्या दीड वर्षांपासून शालेय विद्यार्थ्याने ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत शिक्षण सुरू ठेवले होते. पण ऑनलाइन शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित होते. अखेर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तसेच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 8 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू केल्याने सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या आनंदाने शाळेत हजर होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळांत विद्यार्थ्यांसाठी त्रिसूत्रीचा वापर पाहावयास मिळाला. प्रत्येक विद्यार्थी मास्क परिधान करून वर्गात हजर होता. सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश दिला गेला. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग पालन करूनच वर्ग सुरू करण्यात आले.
दीड वर्षानंतर शाळा सुरू-
गेल्या दीड वर्षांपासून शाळेत स्मशान शांतता होती. विद्यार्थ्यांचा किलबिलाट नसल्याने सन्नाटा पसरला होता. पण आज 4 ऑक्टोबर सोमवारपासून 8 वी ते 12वी वर्ग शाळा सुरू झाल्याने पुन्हा एकदा शाळांत विद्यार्थ्यांचा किलबिलाट किंवा गोंधळ सुरू झाला. दीड वर्षांपासून दुरावलेल्या वर्गमित्रांची पुन्हा एकदा भेट झाली.