समीर वानखेडे आमचा जावई नाही - चंद्रकांत पाटील
हर्बल तंबाकू खाऊन त्यांना विसर पडला आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कळत नाही अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
chandrakant patil
सोलापूर -समीर वानखेडे आमचे जावई नाहीत पण जे चाललंय ते सर्वसामान्य जनतेला न आवडणारे आहे. याचा उद्रेक होईल. तुम्हाला जर वाटत असेल एनसीबी निर्देशक समीर वानखेडे चूक करत आहेत, तर कोर्टात जा आणि त्यांच्या विरोधात केस चालवा असे खडे बोल चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला सुनावले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकार किंवा महाविकास आघाडी सरकारचे हर्बल तंबाखू खाऊन व्यवहार चालू आहेत का, असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. अनिल देशमुख विषयामध्ये तुम्ही एक ही केस जिंकली नाही. तुमच्या पार्टीचे गृहमंत्री गायब झाले आहेत. तुमच्या पार्टीच्या नेत्यांवर दोन बायकांचे आरोप होत आहेत. तुमच्या पार्टीच्या एका मंत्र्याने कार्यकर्त्याला घरी राहून मारले. म्हणून अंधारात अटक केली गेली. या सर्व बाबींचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. हर्बल तंबाकू खाऊन विसर पडला आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या त्यांना कळत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कळत नाही अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची घेतली भेट
गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट आणि तुळजापूर तालुक्यातील शेतकरी काँग्रेस भवन समोर ठिय्या मांडून बसले आहेत. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री या साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन ठिकाणी जाऊन त्यांच म्हणणं ऐकून घेतलं आहे. काँग्रेस भवनसमोरच शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने पाटील यांनी महाविकास आघाडी आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांवर टीका केली.