सोलापूर - महानगरपालिकेचे झोन कार्यालय क्र-8 येथील साहित्य चोरीस गेले असल्याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. महानगरपालिकेचे झोन कार्यालय फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
झोन कार्यालयात ठेवलेले भंगार साहित्य बुधवारी रात्री चोरताना तेथील वॉचमन यांनी पाहिले. तीन अज्ञात चोरांचा चोरी करताना पाठलाग केला. चोरट्यांनी चोरलेले साहित्य फेकून गेटवरून उडी मारून पसार झाले. शंकर विठ्ठल कांबळे (वय 43 वर्ष रा ,रामलिंग नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी 13 ऑगस्टला जेलरोड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार शंकर कांबळे हे झोन क्र 8 कार्यलयातील स्टोअर रूममध्ये वॉचमन शची ड्युटी करत असताना स्टोअर रूममधून साहित्याचा आवाज येत होता. त्यावेळी त्यांनी बॅटरीच्या साहाय्याने पाहिले असता तीन अज्ञात चोरटे हे स्क्रॅप साहित्य घेऊन जात असताना आढळले. शंकर कांबळे यांनी ताबडतोब आवाज देऊन त्या चोरट्यांचा पाठलाग केला असता ,चोरटे साहित्य फेकून गेटवरून उड्या मारून पळून गेले. वॉचमन शंकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांना व क्लर्क यांना फोन करून स्क्रॅप साहित्य चोरीला गेली असल्याची माहिती दिली. झोन अधिकारी व क्लर्क हे घटनास्थळी आले व उघड्यावर ठेवलेले स्क्रॅप साहित्य चोरट्याने लंपास केले असल्याचे समोर आले.
शहरातील सिव्हील हॉस्पिटलसमोर सोलापूर महानगरपालिकेचे झोन क्र. 8 चे कार्यालय आहे. येथील स्टोअर रूममध्ये नगरविकाससाठी लागणारे साहित्य आहे. त्याचबरोबर अतिक्रमणामध्ये जप्त केलेले अनेक लोखंडी साहित्य आहे. दिवसा या झोन कार्यालयात नागरिकांची व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत, दिवसा या कार्यालयात येऊन चोरीचा प्लॅन केला असावा.
31 जुलैपासून व त्या अगोदरपासून अज्ञात चोरट्यांनी झोन कार्यालयातील स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या साहित्यांवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे.
या स्टोअर रूममध्ये ठेवलेले पन्हाळी पत्रे, बीड धातूचे पाईप,अल्युमिनियम दरवाजे,लोखंडी पोल, लोखंडी प्लेट, विजेचे खांब,जर्मन तार बंडल,जुने स्क्रॅप खाट,जुने स्क्रॅप पाईप,लोखंडी पोल,सळई,कंपाउंड ला मारलेले पत्रे,लाकडी वासे,केबल वायर बंडल,अल्युमिनियम शिडी, जुने लोखंडी गेट असा एकूण 96 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.