सोलापूर - शहरासह 31 गावांमध्ये व तीन नगरपालिका क्षेत्रात दहा दिवसांच्या कडक लॉकडवूनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी या लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. शहरातील नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य झाले होते. पोलिसांचा महाप्रसाद खाण्या ऐवजी नागरिकांनी स्वतःला घरातच लॉकडाउन करून घेतले असल्याचे चित्र पाहावायास मिळाले. फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिक व शासकीय कर्मचारी रस्त्यावर दिसत होते. प्रत्येकाचे पास तपासूनच सोडण्यात येत होते.
एसटी स्टँड परिसर, मधला मारुती चौक, सात रास्ता, विजापूर वेस, पार्क चौक आदी मुख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते. कोरोना विषाणू महामारी रोखण्यासाठी सोलापूर प्रशासनाने दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन घोषित केले आहे. 16 जुलैच्या मध्य रात्री पासून ते 26 जुलैच्या मध्य रात्री पर्यंत या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तांनी शहरात यासाठी 2500 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त मध्ये तैनात केला आहे. त्याबरोबर 200 होमगार्ड देखील तैनात केले आहे. पोलीस हवालदारासोबत लॉकडाऊन पर्यवेक्षकही थांबले आहेत. कमांडो, क्यूआरटी आदी सुमारे अडीच हजार पोलीस कर्मचारी, २०० अधिकारी, होमगार्ड, विशेष पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त आहे.
पोलिसांना सहाय्य करण्यासाठी ४०० लॉकडाऊन सहाय्यक, २६ लॉकडाऊन पर्यवेक्षक, २६ क्षेत्र अधिकारी, २६ लॉकडाऊन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. २६ लॉकडाऊन निरीक्षक शहरातील विविध भागात फिरून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करत आहेत.
ग्रामीणमधील लॉकडाऊन गावे व तालुके
बार्शी व वैराग शहर, मोहोळ शहर, कुरुल, कामती खु., कामती बु., उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, मार्डी, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा व भोगाव तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा, कासेगाव, उळेगाव, विडी घरकूल, कुंभारी, वळसंग, होटगी, लिंबीचिंचोळी, तांदूळवाडी, अक्कलकोट शहर, या गावांमध्ये संसर्ग वाढत असल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.