सोलापूर - गावचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून चार हात दूर राहणे पसंद करतात. मात्र एका तरुणाने गावाच्या राजकारणात उडी घेत स्वतःच पॅनल उभं करून ते निवडून आणण्याच विक्रम केला आहे. घाटने ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत लोकनेते बाबुराव अण्णा ग्राम समृद्ध पॅनलने विरोधकांना चारी मुंड्याचित करून 7 पैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे.
21 वर्षाच्या तरुणाची किमया-
मोहोळ तालुक्यातील घाटने ग्राम पंचायती मध्ये एकवीस वर्षाच्या ऋतुराज देशमुख याने गावातील राजकारणाचे चित्र पालटले आहे. ग्राम पंचायतिच्या सात जागांसाठी सात उमेदवार घेत राजकारणात उडी घेतली. सात पैकी पाच जागांवर या एकवीस वर्षीय ऋतुराज देशमुखच्या गटाने विजय प्राप्त केला. ऋतुराजच्या या कार्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनुभवी राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाविद्यालयातुन राजकिय प्रवास सुरू-
बीएस्सी चे शिक्षण घेत असताना राष्ट्रवादी विद्यार्थी सेने पासून राजकारणाची सुरुवात झाली. महाविद्यालयात विद्यार्थी प्रश्नांना प्राधान्य देत सुरू केलेला ऋतुराजचा राजकिय प्रवास वयाच्या 21व्या वर्षी गावच्या राजकारणापर्यंत पोहोचला. 21 वर्षाचा ऋतुराज या राजकारणाकडे समाजसेवा म्हणून बघत आहे. गावच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, त्याला भेडसावत असल्याने गावकऱ्यांना न्याय द्यायचा असल्याचे ऋतुराजने सांगितले.
पाण्याचा प्रश्न सोडवणार-
सीना नदीकाठी घाटने गाव असले तरी ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. तर पावसाळ्यात नदीतून खाद्यांवर अबाल वृद्धांना पाणी आणावे लागते. याचा विचार करून गावासाठी आर ओ प्लांट व सौर उर्जेचा युनिट बसवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती ऋतुराज देशमुख या युवा ग्रामपंचायत सदस्याने दिली.
गावात व जिल्ह्यात ऋतुराजची चर्चा-
आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या उमेदवारांना सोबत घेत पाच पैकी सात जागांवर विजय मिळवणाऱ्या ऋतुराज देशमुख बद्दल मोहोळ तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे.
हेही वाचा-राम कदम यांना उपोषणस्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात