सोलापूर - स्वाभिमानीला मंत्रिपद मिळावे ही संघटनेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. मात्र, मंत्रिपद कुणाला मागत फिरणार नाही. ते सन्मानाने मिळाले तर विचार करू, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सोलापुरात स्पष्ट केली.
सन्मानाने मिळाले तर ठीक, पण मंत्रिपद मागत फिरणार नाही - राजू शेट्टी - Solapur Latest News
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकार्यकारणीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सोलापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यकार्यकारिणीचा मेळावा पार पडला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी यांना आपण महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष आहात मंत्रीपदाबाबत इच्छुक आहात काय? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली.
2014 च्या निवडणुकीनंतर स्वाभिमानीच्या शेतकरी प्रश्नाचे भांडवल करून तत्कालीन संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवले. मात्र, त्यांनी स्वाभिमानीच्या तत्वांना तिलांजली देत काडीमोड घेतला. आता 2019 च्या निवडणुकांनंतर चित्र उलटे झाले आहे. तरीही राजू शेट्टी यांनी सावध पवित्र घेत शेतकरी प्रश्नांना आणि आपल्या पक्षाच्या नव्याने बांधणीला प्राधान्य दिले आहे. ही भूमिका स्वाभिमानीच्या आगामी वाटचालीला दिशादर्शक ठरणार आहे, हे मात्र नक्की.